Friday, January 15, 2010

याचसाठी केला होता अट्टाहास...



कन्याकुमारी. भारताच्या मुख्य भूमीचं सर्वात शेवटचं टोक. पुढे अथांग सागर.. तीन समुद्रांचा संगम, कन्यादेवीचं मंदिर, पुराणभूमी. स्वामी विवेकानंदांना जिथं प्रेरणा मिळाली, ती पवित्र भूमी कन्याकुमारी... आज मात्र हे छोटंसं गाव माणसांनी अगदी फुलून गेलं होतं. तसं एक तीर्थक्षेत्र म्हणून इथं नेहमीच गर्दी असते. आजही इथं जणू कुंभमेळाच भरला होता. पण एरवी सागराकडे खिळणा-या नजरा आज आकाशाकडे वळल्या होत्या. कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी.
लहानपणी भूगोलात या अनोख्या ग्रहणाविषयी वाचलं होतं. खग्रास आणि खंडग्रास ग्रहणं तर नेहमी होतात. पण कंकणाकृती ग्रहण खूपच कमी वेळा घडणारी गोष्ट. त्यामुळंच एकदातरी कंकणाकृती ग्रहण पहायचंच हे तेव्हाचं स्वप्न आता पूर्ण झालंय. तेवढ्यासाठीच वेळ काढून कन्याकुमारी गाठलं. ग्रहण तुला अशुभ आहे असं, अनेकांनी सांगितल्यावरही. दोन दिवस इथली होऊन राहिले. विवेकानंद रॉक, थिरुवल्लुर पुतळा, शुचीन्द्रम, पद्मनाभन पॅलेस असा फेर-फटकाही झाला. पंचागानुसार ग्रहणाचे वेध दोन तास आधी लागतात. पण मला तर दोन दिवस आधीपासूनच वेध लागले होते.

त्रिवेन्द्रम ते धनुष्कोडी-रामेश्वरम या पट्ट्यात ग्रहण सर्वात जास्त वेळ दिसणार होतं. म्हणूनच अख्ख्या भारतातून, नव्हे जगभरातून हजारो लोक दक्षिण तामीळ नाडूत दाखल झाले होते. (त्यातही मराठी माणसं मोठ्या संख्येनं आलेली, हे विशेष. मराठी विज्ञान परिषद, खगोल मंडळ आणि अनेक हौशी खगोलप्रेमी, तसंच शाळांचे विद्यार्थी, अय्यप्पाच्या यात्रेसाठी आलेले हजारो भाविक... त्या गर्दीत मीही एक. मुंबईत राहणारी असल्यानं गर्दी मला नवी नाही. पण इथं एक वेगळीच उर्जा वाहताना जाणवली. मग अय्यपांच्या भक्तांबरोबर केलेलं भजन असो, वा खगोलतज्ञांचं मार्गदर्शन. त्यातच पोंगल (मकर संक्रांती) असल्यानं सगळीकडे उत्सवाचं वातावरण.. आकाशात ढग जमा झाल्यानं ग्रहण दिसणार की नाही, अशी घालमेल आणि ग्रहणाच्या दिवशी तुरळक ढग वगळता आकाश अगदी स्वच्छ पाहून टाकलेला निश्वास..
आमचा सहा जणांचा छोटासा ग्रुप- मी, माझे २ भाऊ, आत्या आणि दोन आतेबहिणी, काही प्रोफेशनल फोटोग्राफर्स आणि खगोलप्रेमी कॅमेरे, सोलर फिल्टर्स, वगैरे सगळा जामानिमा समुद्र किनारी एका हॉटेलच्या टेरेसवर जमा झालो. एकीकडे पसरलेला बंगालचा उपसागर, समोर विवेकानंद रॉक आणि वर तळपणारा सूर्य. त्या सूर्याला पाहून म्हटलं, तुला रे काय ठावूक आज काय ड्रामा घडणार आहे? तो योग आम्हा पृथ्वीवासियांच्या भाग्यातच लिहिलेला.. (त्याच भाग्यवान माणसांपैकी एक, म्हणून माझी कॉलर ताठ झाली हं!)
कले-कलेनं सूर्य चंद्राआड झाकला गेला. तसं समुद्रपक्षी कावरे-बावरे होऊन सगळीकडे पाहू लागले. आकाश अंधारून गेलं आणि अखेर तो क्षण आला. आकाशातली कंकणाकृती पाहून नजर अगदी खिळून गेली. दोन दिवसांचा ट्रेनचा प्रवास, कन्याकुमारीतलं वास्तव्य, सगळ्याचं अगदी सार्थक झालं. सूर्याचं ते ग्रासित बिंब अजूनही डोळ्यांसमोर तरळतंय. सारखं वर पाहून मान दुखू लागली तेव्हाच आसपासच्या जगाची पुन्हा जाणीव झाली.
ग्रहण संपलं, आणि भाविक समुद्रात स्नानासाठी उतरले. आणि इथं गच्चीत चर्चा सुरू झाली, ग्रहणाशी संबंधित चालीरीतींवर. ग्रहणात स्नानानं पुण्य मिळतं, अशी समजूत, साहजिकच मला न पटणारी. पण शेवटी ज्याची त्याची श्रद्धा. शास्त्रज्ञसुद्धा त्यांच्या तत्त्वांवर- विज्ञानातल्या नियमांवर पूर्णपणे विश्वास ठेवतातच ना? तुम्ही आम्ही सामान्य माणसंसुद्धा त्याला अपवाद नाही. प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असतेच. म्हणूनच विज्ञान की तत्त्वज्ञान की आमची श्रद्धा हा वादच व्यर्थ वाटला मला.
अर्थात, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फरक असतो, आणि तोच फरक समजण्य़ाची कुवत विज्ञान देतं. बाकी पुण्य कमावण्यासाठी असो, वा केवळ विज्ञानावरच्या प्रेमापोटी. आम्ही जगाच्या वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या जाती-धर्मांचे लोक, सारख्याच उत्सुकतेनं, कन्याकुमारीत एकत्र आलो. एका दुर्मीळ क्षणाचे साक्षीदार बनलोय. पृथ्वीवर घडलेला हा एक चमत्कारच, नाही का?
आकाशातले दोन गोल. आपापल्या वाटेवरून त्यांचा प्रवास चाललाय युगेयुगे. पण याच प्रवासात काही क्षण असे येतात जे तुम्हा-आम्हा पृथ्वीवासियांसाठी रोमांचक ठरतात. माझ्याही आठवणींमध्ये ते असेच कायमचे बंदिस्त झालेयत. शुभ-अशुभ अशा चिंता कशाला? ऐसे मौके बारबार नही आते..
(also posted on www.starmajha.com)

No comments:

Post a Comment